तापी-बुराई योजना पुन्हा रखडली....

Latest News

Sunday, 6 September 2020

ऑनलाईन कनेक्टीव्हीटीकरिता भर पावसात डोंगरावर भटकंती

mdtv


 वाण्याविहीर : सध्या कोरोना महामारीमुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे प्रवेश अनेक महाविद्यालयात आॅनलाईन प्रणालीद्वारे होत आहेत. सातपुड्यातील तसेच इतर ठिकाणच्या अतिदुर्गम भागातील अनेक विद्यार्थी आॅनलाईन प्रणालीद्वारे शाळा, महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जेथे इंटरनेट कनेक्टीव्हिटी आहे तेथे जाऊन प्रवेश निश्चित करीत आहेत. परंतु प्रवेश घेतल्यानंतर चालू वर्षीचा अभ्यास करणे या विद्यार्थ्यांसाठी जिकरीचे होत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खडकापाणी येथील अनेक विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे मोबाईल उपलब्ध आहेत, अशा विद्यार्थ्यांना अश्या प्रकारे कुठेही बसून, अभ्यास करावा लागत आहेत. या भागात जवळ जवळ कुठेही टॉवर नसल्यामुळे डोंगरावर चढल्या शिवाय उपाय नसतो. सातपुड्यातील अनेक गावात ही समस्या असल्याने याकडे प्रशासन व सरकारने लक्ष देणे आवश्यक आहेत.

राज्यातील ८० टक्के शाळा, महाविद्यालयांनी प्रवेशीत विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रणालीद्वारे शिकवण्यासही सुरूवात केली आहे. शिवाय खाजगी क्लासेस चालकांनीदेखील आॅनलाईन शिकवण्या सुरू केल्या आहेत. त्यात आताच न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जातीलच या निर्णयामुळे या आदिवासी मुलांचे काय हाल होतील.

आदिवासी पाड्यांवरील अनेक विद्यार्थ्यांना मोबाईल इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे ही पद्धत कुचकामी ठरत आहे. म्हणून याचा फटका अशा विद्यार्थ्यांना बसत आहेत. तरी शिक्षणाची ओढ असलेले विद्यार्थी जेथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी भेटेल तिथे व फक्त ज्यादिवशी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असते त्यादिवशी आॅनलाईन तासिकाही बुडतात. तसेच आता पावसामुळे या अडचणीत अधिकच भर पडत असते. तरी दगडगोट्यांवर बसूनही आॅनलाईन प्रणालीचा वापर करून अभ्यास करावा लागत आहेत. सरकारने २१ आॅगस्ट २०२० रोजी केंद्राकडे शैक्षणिक वर्ष बदलण्याचा प्रस्ताव पाठवला असून, राज्यात काहीही झाले तरी १०० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत आॅनलाईन, आॅफलाईन जसे शक्य होईल तसे शिक्षण मिळालेच पाहिजे अशी, अट घातली असली तरी अतिदुर्गम भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि मोबाईलची अनुपलब्धता यामुळे ही पद्धत कुचकामी ठरणार आहे. म्हणून आॅनलाईन पद्धतीने शिक्षण देणे शक्य होईल. परंतु त्यासाठी सरकारने इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल उपलब्ध करून देणे आवश्यक ठरेल.

घरापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आणि १०० मीटर अंतराचा डोंगर चढून डोंगराच्या शेवटच्या टोकावर चार-पाच दगड आहे. त्या दगडावर उभे राहून लेक्चर पहावे लागते.

-सुक्रम काल्या वसावे, द्वितीय वर्ष एम.कॉम, सावित्रीबाई फुले विद्यापीठ

सध्या पावसाचे वातावरण असल्यामुळे आम्हाला इथे डोंगरावर येऊन सुध्दा नेटवर्कचा स्पीड जेमतेम १०० ते २०० केबी भेटत असल्यामुळे लेक्चर अटेंड करण आणि लेक्चर डाऊनलोड करण्यासाठी मोठी कसरत करावी लागतेय. त्यात तीन ते चार जण एकत्र बसल्यावर तेवढा पण स्पीड भेटत नाहीत.

ट्रकने उडविला पृथ्वी स्तंभ.

mdtv

 



नंदुरबार : अपघातग्रस्त ट्रक पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी आणत असताना अचानक ब्रेक फेल झाल्याने ट्रकने स्टेट बँकेसमोरील लायन्सच्या सुशोभिकरण स्तंभाला धडक दिली. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या या चौकात सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, अपघातग्रस्त ट्रकची पुर्णत: तपासणी न करताच ती पोलीस ठाण्यात जमा करण्याची घाई का करण्यात आली याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नवापूर ते कोळदा दरम्यान रस्ता दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे त्या मार्गावरील रेल्वेगेट बंद असल्याने नवापूर-धुळे मार्गावरील वाहतूक ही उच्छल, निझर, नंदुरबारमार्गे वळविण्यात आली आहे. परिणामी या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ राहत आहे. त्यातील अवजड ट्रकचा (क्रमांक टीएन ५२-जे. ८३७६) शुक्रवारी सकाळी चौपाळे शिवारात अपघात झाला होता. अपघातग्रस्त ट्रक सायंकाळी पोलिसांनी तालुका पोलीस ठाण्यात जमा करण्यासाठी आणण्याचे ठरविले आणि हा अपघात झाला.

अपघातग्रस्त ट्रक खाजगी चालकाला घेऊन पोलिसांनी शहरातील वर्दळीच्या रस्त्याने आणली. वाघेश्वरी चौफुली ते स्टेट बँक मार्गावर मोठा मारुती मंदीराजळ ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले. सायंकाळची वेळ असल्याने मोठा मारुती ते स्टेट बँक दरम्यान मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. जीवीत हानी टाळण्यासाठी चालकाने कसोशिने प्रयत्न केले.

ट्रक गिअरच्या माध्यमातून नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश येत नसल्याचे पाहून चालकाने ट्रक थांबविण्यासाठी थेट स्टेट बँकसमोरील रस्ता दुभाजकात लायन्सने उभारलेल्या पृथ्वीच्या प्रतिकृतीला धडक दिली. त्यात पृथ्वीच्या प्रतिकृतीचा स्तंभ पुर्णत: ट्रकखाली दाबला गेला. त्यामुळे ट्रक थांबण्यास मदत झाली. सुदैवाने यावेळी कुणीही दुचाकी किंवा इतर वाहन त्यावेळी आले नसल्याने मोठा अनर्थ टळला.

अपघात भयंकर आणि त्याचा आवाज एवढा मोठा होता की त्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. जर सकाळच्या वेळी ही घटना घडली असती तर जीवीत हानी झाली असती असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

याबाबत रात्री उशीरापर्यंत पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Friday, 4 September 2020

'LAC वर स्थिती तणावपूर्ण, मात्र आपलं सैन्य सज्ज': लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे.

mdtv

 

'LAC वर स्थिती तणावपूर्ण, मात्र आपलं सैन्य सज्ज': लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे


पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

 दोन दिवसांच्या दौऱ्यात लष्करप्रमुखांनी सैनिकांच्या ऑपरेशनल तयारीचा आढावा देखील घेतला

लडाख : पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दोन दिवस लडाखचा दौरा केल्यानंतर लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी म्हटलं आहे की, 'LAC वर स्थिती तणावपूर्ण आहे, मात्र आपलं सैन्य प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. मागील तीन महिन्यांपासून स्थिती तणावपूर्ण आहे मात्र आपल्या जवानाचं मनोबल उंचावलेलं आहे', असं ते म्हणाले.
गुरुवारपासून लडाख दौऱ्यावर आहेत लष्करप्रमुख

भारत आणि चीनदरम्यान सीमेवर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. 29-30 ऑगस्टच्या रात्री लडाखमधील पँगाँग त्सो लेकच्या दक्षिण भागात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली. चिनी सैन्याकडून जमीन आणि हवाई क्षेत्रातून घुसखोरीचा प्रयत्न झाला. दरम्यान भारतानेही चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं. या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे लडाखच्या दौऱ्यावर आहेत. काल, गुरुवारी लष्करप्रमुखांनी काही फॉरवर्ड लोकेशन्सचा दौरा केला. आपल्या या दोन दिवसांच्या दौऱ्यात लष्करप्रमुखांनी सैनिकांच्या ऑपरेशनल तयारीचा आढावा देखील घेतला. लष्करप्रमुखांच्या दौऱ्याआधी  बुधवारी वायुसेना प्रमुख आर के एस भदौरिया यांनी पूर्व लडाखचा दौरा केला होता. वायुसेना प्रमुखांनी चीनच्या सीमेला लागून असलेल्या सिक्किम, असम, अरुणाचल, मेघालयमध्ये वायुसेनेच्या कॉम्बॅट यूनिट्सच्या आपरेशनल तयारीचा आढावा घेतला होता.


India-China Border Faceoff: तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख लडाखच्या दौऱ्यावर, सीमेवरील तयारीचा आढावा
भारतीय सैन्यानं तयारीत राहायला हवं- जनरल रावत
चीनशी सुरु असलेल्या वाटाघाटीदरम्यान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी मोठं सूचक वक्तव्य केलं आहे. भारतीय सैन्यानं तयारीत राहायला हवं, असं जनरल रावत यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आपल्या तीनही सेनांनी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सनं तयारीत राहावं. कारण चीनशी आपल्याकडून धोका असल्याचं बघून पाकिस्तान त्याचा फायदा उचलू शकतो. त्यामुळे कुणी जर चुकीचं साहस करुन आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर आपण जशास तसं उत्तर दिलं पाहिजे, असं जनरल रावत म्हणाले. जनरल रावत म्हणाले की, चीन ज्या पद्धतीनं रणनीतीनुसार आर्थिक आणि धोरणात्मक मदत पाकला करतंय हे पाहता आपल्याला मोठ्या प्रमाणावर तयारीत राहायला हवं.  सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हटलं की, जर त्यांनी पूर्व लडाखमधील भारत-चीन वादाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. असं त्यांनी म्हटलंय.

भारत-चीनदरम्यान अधिकृत सीमेची आखणी नाही, त्यामुळे सीमावाद सुरूच राहणार : वांग यी 


भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष 
भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष झाला आहे. 29-30 ऑगस्टदरम्यान रात्री ही घटना घडली आहे. लडाखमधील पँगाँग त्सो लेकच्या दक्षिण भागात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये ही झटापट झाली. चिनी सैन्याकडून जमीन आणि हवाई क्षेत्रातून घुसखोरीचा प्रयत्न झाला. दरम्यान भारतानेही चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं. याआधी 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यांमध्ये हिंसक झटापट झाली होती. यामध्ये 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. तर चीनचंही मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे. सीमेवरील तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीनमध्ये कमांडर स्तरावर चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या फ्लॅग मीटिंग सुरु आहे. मात्र त्यातच दोन्ही देशांमधील सैन्यांमध्ये झटापट झाल्याने तणाव पुन्हा वाढला आहे. दरम्यान झटापट झाल्याची अधिकृत माहिती भारतीय सैन्याचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी दिली आहे. मात्र यामध्ये जीवितहानी झाली आहे का, किंवा कोणत्या प्रकारचं नुकसान झालं आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


काय म्हणाले होते चीनचे परराष्ट्र मंत्री
युरोप दौऱ्यावर असणारे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी महत्वाचं वक्तव्य केलं होतं. वांग यी म्हटले होतं की, भारत-चीनमध्ये कोणत्याही प्रकारच्या अधिकृत सीमांची आखणी झाली नसल्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर यापुढेही वाद सुरूच राहतील. पण चीन भारताशी असलेल्या सर्व वादांच्या मुद्द्यांवर चर्चेतून मार्ग काढायला तयार आहे. त्यांनी हे वक्तव्य सोमवारी पॅरीसमधील ' फ्रेंच इंस्टीट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स ' या संस्थेतील एका कार्यक्रमात केले.


भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष 
वांग यी यांनी पुढे म्हटलं होतं की, भारत-चीन संघर्षाकडे जगाचं लक्ष आहे. या दोन देशांदरम्यान आतापर्यंत कोणत्याही अधिकृत सीमांची आखणी झालेली नाही. त्यामुळं हे अशा प्रकारचे वाद भविष्यातही होत राहतील. परंतु चीनची भारतासोबत कोणत्याही वादावर चर्चेची तयारी आहे. याआधीही चीनचे अध्यक्ष शी झिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अनेक मुद्द्यांवर सहमती झाली आहे. त्यात दोन देशांत असलेले मतभेद बाजूला ठेवून द्विपक्षीय सहकार्यावर अधिक भर देण्याचेही ठरले आहे.


India China BorderIndo China Border FaceoffManoj Mukund Naravane

गोमांस पकडून देणाºयांना मारहाणीचा प्रयत्न....

mdtv

 


तालुक्यातील फत्तेपूर येथून शहादा शहरात बेकायदेशीररित्या विनापरवाना गोमांस विक्रीसाठी आणणाऱ्या सहा जणांविरोधात शहादा पोलीस ...

शहादा : तालुक्यातील फत्तेपूर येथून शहादा शहरात बेकायदेशीररित्या विनापरवाना गोमांस विक्रीसाठी आणणाऱ्या सहा जणांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एक रिक्षेसह सुमारे २०० किलो गोमांस जप्त केले आहे. विशेष म्हणजे याबाबत बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्यांना शहादा पोलिसांच्या ताब्यात देणाºयांना या विक्रेत्यांकडून लाठ्याकाठ्यांच्या सहाय्याने मारहाण केल्याचा प्रयत्न झाला असल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.शहादा शहरातील पाडळदा चौफुली येथे १ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास रिक्षा (क्रमांक एम.एच.-३९ जे-६७९४) जात असताना रिक्षामधून लालसर पाणी रस्त्यावर पडत असल्याचे दिसल्याने शहरातील सोहेल कादर शेख व जाहेद जहागीर शेख या दोघांना संशय आल्याने त्यांनी रिक्षाचालक जुबेरखान कुरेशी यास रिक्षा थांबवून रिक्षात काय आहे? अशी विचारणा केली असता जुबेर व त्याचे दोन मित्र रिक्षा सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी रिक्षाची तपासणी केली असता रिक्षाच्या चालकाच्या सीटखाली प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गोमांस आढळून आले.शासनाने गोमांस विक्रीवर बंदी घातली असल्याने तुम्ही शहादा शहरात विक्री करण्यास का आणले अशी विचारणा करीत असताना शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीतील रिजवानखा मुक्तारखा कुरेशी, आमिरखा मुक्तारखा कुरेशी, इरफानखा मुक्तारखा कुरेशी यांनी सोहेल कादर शेख, जहागीर शेख, नगरसेवक रियाज कुरेशी, कामिल कुरेशी, अस्लमखा कुरेशी, इरफान कुरेशी यांच्याशी वाद घालत लाठ्याकाठ्या, लाथाबुक्क्यांनी व धारदार शस्त्रांनी मारहाण करण्यास सुरुवात केल्याने काही काळ तनावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर रिक्षाचालक जुबेर व त्याच्या साथीदारांनी रिक्षा सोडून पलायन केले. नंतर सोहेल व नगरसेवक रियाज कुरेशी यांनी ही रिक्षा व गोमांस व मारहाणीत वापरण्यात आलेले शस्त्र पोलीस ठाण्यात आणून जमा केले. पोलिसांनी सर्व वस्तू जप्त केल्या असून मांसाच्या तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक पेंढारकर, पंचायत समितीचे पशुधन विस्तार अधिकारी डॉ.गजानन डहाळे, पशुधन पर्यवेक्षक विकास देवरे, परिचर केतू चकने यांच्या पथकाला पोलीस ठाण्यात पाचारण करुन मांंसाचे नमुने तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.या प्रकरणी शहादा पोलिसात सोहेल कादर शेख याच्या फिर्यादीवरून जुबेरखा करीमखा कुरेशी, फरीदखा करीमखा कुरेशी, सलमानखान सलीमखा कुरेशी (सर्व रा.फत्तेपूर, ता.शहादा), रिजवानखा मुक्तारखा कुरेशी, अमीरखा मुक्तारखा कुरेशी, इरफानखा मुक्तारखा कुरेशी (सर्व रा.गरीब नवाज कॉलनी, शहादा) या सहा जणांविरोधात बेकायदेशीररित्या गोमांस बाळगून त्याची वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी तसेच बेकायदेशीररित्या जमाव जमून मारहाण केली याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व सहा आरोपी फरार झाले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भदाणे करीत आहेत.गेल्या अनेक वर्षापासून तालुक्याती फत्तेपूर येथे गोमांस व गोवंश यांची विक्री व वाहतूक करण्याचा व्यवसाय खुलेआमपणे सुरु आहे. बेकायदेशीररित्या तालुक्यात व तालुक्याबाहेर हा व्यवसाय सुरू आहे. १ सप्टेंबरला जो काही प्रकार घडला तो शहरातील समव्यवसायिकांच्या दक्षतेमुळे उघडकीस आला असून पोलिसांनी आता याप्रकरणी सखोल चौकशी करून यातील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


तापी-बुराई योजना पुन्हा रखडली....

mdtv

 


तापी पाटबंधारे विकास महामंडळाने फेब्रुवारी १९९९ मध्ये मंजूर केलेली तापी-बुराई उपसा योजनेचे काम पुन्हा ...

नंदुरबार : तापी पाटबंधारे विकास महामंडळाने फेब्रुवारी १९९९ मध्ये मंजूर केलेली तापी-बुराई उपसा योजनेचे काम पुन्हा थंडावले आहे. भाजप सरकारच्या काळात या योजनेला ती मिळाली होती. आता सरकार बदलले आणि योजनाही थंडावली आहे. निधीची अपुरी तरतूद, पंपगृहांसाठी लागणारी विजेची तरतूद आदी समस्या कायम सुटलेल्या नाहीत. २० वर्षात केवळ एकच टप्पा पुर्ण होऊ शकला आहे. यावरूनच या योजनेचे भवितव्य स्पष्ट होते.

नंदुरबार, साक्री व शिंदखेडा तालुक्यातील अवर्षण प्रवण गावांसाठी जिवनदायी ठरणारी तापी-बुराई योजनेस तापी पाटबंधारे विकास महामंडळाने २ फेब्रुवारी १९९९ ला मान्यता दिली होती. नदीजोड प्रकल्प म्हणूनही देखील या योजनेकडे पाहिले जाते.

तीन तालुक्यांना लाभदायी

ही योजना तीन तालुक्यांना लाभदायी ठरणार आहे. नव्या आराखड्यानुसार बलदाणेचे अमरावतीनाला धरण भरण्यात आल्यास (६६ दशलक्ष घनमीटर पाणी) पूर्वेकडील नेहमीच अवर्षण प्रवण असलेल्या गावांना त्याचा लाभ होणार आहे.

तापी-बुराई उपसा योजना कार्यान्वीत झाली तरी या भागातील पाणी समस्या मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होणार आहे. तापी तीरावरील हाटमोहिदा गावाजवळ इनटेक चॅनेल व जॅकवेल बांधण्यात येणार आहे. त्यातून उपसाद्वारे ४१.४७ घनमीटर पाणी उचलण्यात येणार आहे. जॅकवेलपासून १६०० मि.मी.व्यासाच्या पाईपलाईनद्वारे पाणी नेण्यात येणार आहे. या पाण्याचा प्रवासातील पहिला टप्पा निभेंल येथे राहणार आहे. तेथील साठवण तलावात हे पाणी टाकण्यात येईल. नंतर तेथून हे पाणी उचलून १५०० मि.मी. व्यासाच्या पाईपलाईनद्वारे आसाणे येथील साठवण तलवात टाकण्यात येईल. तेथून पुन्हा हे पाणी उचलून ११५० मि.मी.व्यासाच्या पाईपलाईनद्वारे शनिमांडळ तलावात पाणी टाकले जाणार आहे. तेथून बुराई मध्यम प्रकल्पात पाणी नेण्यात येणार आहे.

शनिमांडळ लघु पाटबंधारे प्रकल्पातून अमरावती नदीद्वारे पाणी नेवून मालपूर, ता.शिंदखेडा येथील अमरावती मध्यम प्रकल्पात (१० दशलक्ष घनमीट पाणी)पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे शनिमांडळ ते वैंदाणे-मालपूर या दरम्यान ही नदी बारमाही प्रवाहीत राहील. शनिमांडळ प्रकल्पातून पुढे बुराई प्रकल्पात अर्थात वाडी-शेवाडी (सहा दशलक्ष घनमीटर) पाणी नेले जाणार आहे. तेथून बुराई नदी बारमाहीचा प्रयत्न आहे.

जमिनीचा प्रश्न

पहिल्या टप्प्यातील निंभेल प्रकल्पासाठी वन जमिनीचा प्रयत्न करावा लागणार आहे. खाजगी सल्लागारामार्फत वनजमीन संपादनासाठी निविदेनुसार कार्यवाही सुरू आहे. वनजमीन संपादन करण्यासाठी पर्यायी जमिनीसाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे यापूर्वीच सादर करण्यात आला आहे. तर खाजगी जमीन मिळविण्यासाठी ९० टक्के खातेदार शेतकऱ्यांचे संमतीपत्र पाटबंधारे विभागाकडे आलेली आहेत. दर निश्चिती होऊन शेतकºयांना मोबदला दिला जाणार आहे.

जखमी अजगरास जीवदान

mdtv

 


 शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील योगेश पाटील यांच्या शेतात मजूर निंदणीचे काम करीत असताना एका 

सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील योगेश पाटील यांच्या शेतात मजूर निंदणीचे काम करीत असताना एका मजुरास भला मोठा साप दिसला. त्यांनी त्वरित शेतमालक योगेश पाटील यांना सांगितले. योगेश पाटील यांनी सारंगखेडा येथील सर्पमित्र सागर राजपूत आणि निलेश नाईक यांना संपर्क केला.

सर्पमित्र सागर राजपूत, विशाल ठाकरे, नीलेश नाईक व आकाश नाईक यांनी शेतात जाऊन बघितले असता तेथे जवळपास सहा ते सात फूट लांबीचा अजगर होता. या अजगराच्या तोंडाजवळ एक जखम होती. त्यांनी अजगरास सुरक्षितपणे पकडून उपचारासाठी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कार्यालयात आणले. त्याच्यावर सर्पमित्र अविनाश पाटील यांनी उपचार केला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष सागर निकुंभे, उपाध्यक्ष भीमसेन रावताळे, सचिव हितेश पाटोळे आदी उपस्थित होते. नंतर वनविभागात नोंद करून अजगरास निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले.

Thursday, 3 September 2020

धुळे विभागाला १० दिवसात ५८ लाखांचे उत्पन्न..

mdtv


 धुळे:-एस.टी.ने ५५ हजार प्रवाशांनी केला प्रवास, मालवाहतुकीतून मिळाले २२ लाख रूपये

कोरोनामुळे तब्बल साडेचार महिने बंद असलेली आंतरजिल्हा बसवाहतूक २० आॅगस्टपासून सुरू करण्यात आलेली आहे. गेल्या १० दिवसात
धुळे:- विभागाला ५८ लाख ३८ हजार ६९८ रूपयांचे उत्पन्न मिळालेले आहे.राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, २२ मार्चपासून एस.टी.ची. सेवा बंद होती. त्यानंतर लॉकडाउनच्या चौथ्या टप्यात शासन निर्देशानुसार रेड झोन व नॉन रेडझोन असे दोन टप्पे करण्यात आले होते. त्यानुसार नॉनरेड झोनमध्ये २२ मे २०२० पासून बससेवा सुरू करण्यास हिरवा कंदील मिळाला होता. ंमात्र या बससेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता.दरम्यान २० आॅगस्टपासून आंतरजिल्हा बससेवा सुरू झालेली आहे. गेल्या १० दिवसात परिवहन महामंडळाच्या आंतरजिल्हा बससेवेला प्रतिसाद मिळाला आहे.धुळे विभागाने १० दिवसात ३ लाख ५५ हजार ४९० किलोमीटर बस चालवून त्याद्वारे ५५ हजार प्रवाशांची वाहतूक केली. यातून विभागाला ५८ लाख ३८ हजार ६९८ रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.तर मालवाहतुकीतून गेल्या तीन महिन्यात २२ लाख १२ हजार ६८४ रूपयांचां महसूल प्राप्त झाल्याची माहिती विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली. जिल्हांतर्गत वाहतूक करतांना बसमध्ये फक्त २२ प्रवाशांना परवानगी देण्यात आलेली आहे. बसमध्ये सामाजिक अंतर व तोंडावर मास्क लावणे बंधनकारक आहे. धुळे विभागातून संगमनेर-पुणे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे औरंगाबाद, चोपडा या लांब व मध्यम पल्याच्या बसेस सुरू आहेत. तालुकांतर्गत शिंदखेडा, शिरपूर साक्री, दोंडाईचा, आदी ठिकाणी जाणाऱ्या बसेस सुरू आहे.

सिलिंडर भरण्यासाठी पैसेच नाही....

mdtv


ब्राह्मणपुरी : गोरगरीबांच्या घरातील स्टोव्हसाठी रेशनकार्डावर मिळणारे रॉकेल बंदच झाल्याने त्यांचे हाल होत ... 

ब्राह्मणपुरी : गोरगरीबांच्या घरातील स्टोव्हसाठी रेशनकार्डावर मिळणारे रॉकेल बंदच झाल्याने त्यांचे हाल होत आहेत. परिणामी नागरिकांना पुन्हा चूल पेटविण्याशिवाय पर्याय राहिला नाही. उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर देण्याचे स्वप्न सरकारने दाखविले पण सिलिंडर भरण्यासाठी पैसेच नसल्याने गरीबांना वर्षाला कसेबसे पाच ते सहा सिलिंडर वापरावे लागतात. त्यामुळे योजनेचा मूळ उद्देशच बाजूला पडला आहे. गॅसही नाही व रॉकेलही नाही अशी अवस्था झाली असून रेशनकार्डावर पुन्हा रॉकेल देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.रेशन दुकान हे सर्वसामान्यांचा आधारवड आहे. लॉकडाऊनमध्ये रेशन दुकानांनी अनेक कुटुंबांना जगविले. सध्या रेशनवर गहू, तांदूळ मिळतो. पूर्वी रॉकेलही मिळत होते. सध्या हे रॉकेल बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. सर्वसामान्य कुटुंबासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजना आणली होती. या योजनेतून सर्वसामान्यांना गॅस सिलिंडर दिले जाणार होते. आॅनलाईन गॅस भरण्यासाठी पैसेही बँकेत जमा करण्यात आले. परंतु गॅस भरण्यासाठी बँकेत तीन महिन्याकरिता पैसे जमा करण्यात आले. आता ते बंद झाल्याने लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसणाऱ्या कुटुंबीयांना गॅस भरणे परवडत नसल्याने गॅससाठी पैसे आणायचे कुठून? असा प्रश्न पडला आहे. उज्ज्वलाचा गॅसही नाही आणि हक्काचे मिळणारे अनुदानातील रॉकेलही नाही. शहरी भागातील दाट लोकवस्ती आणि अतिदुर्गम भागातील झोपडपट्टी भागात सकाळी आंघोळीचे पाणी तापविणे, स्वयंपाक करणे यासाठी सर्रास पुन्हा चुलीचाच वापर केला जातो किंवा स्टोव्हचा वापर केला जातो. पण रॉकेल मिळत नसल्याने अडचणी येत आहेत.रेशनकार्डवरील रॉकेल नियंत्रित दराने मिळत होते. प्रत्येक कुटुंबाला पाच ते २४ लीटरप्रमाणे संख्येनुसार रॉकेल मिळत होते. पण एक गॅस सिलिंडर असणाऱ्यांनाही चार लीटर प्रतिमहिना प्रतिकार्ड रॉकेल दिले जात होते. पण हे रॉकेल वाटप बंदच असल्याने नागरिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. शहादा तालुक्यात उज्ज्वला योजना केंद्र सरकारच्या धोरणामुळे सुरू झाली. शहादा तालुक्यातील सोना गॅस एजन्सी, रेखा गॅस एजन्सी, वेदांत गॅस एजन्सी, आदिराजा गॅस एजन्सी मिळून तालुक्यात सुमारे १५ हजार ८१६ उज्ज्वला योजनेतील गॅस कनेक्शन आहेत. या ग्राहकांचा गॅस वापरण्याचे प्रमाण कमी आहे. हे ग्राहक गरीब कुटुंबातील असल्याने उज्ज्वला गॅस ते पर्याय म्हणून वापरतात. त्यामुळे वर्षाला चार ते पाच सिलिंडरच ते घेतात. त्यामुळे ते चुलीचा वापर पुन्हा करतात.

खड्ड्याने केले अनेक वाहनांची नादुरूस्ती....

mdtv


कोळदा ते सेंधवा या दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. हेच काम प्रकाशा ते ...

प्रकाशा : कोळदा ते सेंधवा या दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. हेच काम प्रकाशा ते तळोदा चौफुलीजवळ अपूर्णावस्थेत असल्याने गेल्या सहा महिन्यापासून वाहनधारकाना अडचणीचे ठरू पाहात आहे. सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे याठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या खड्ड्यामुळे अवजड वाहनाचा मागील भाग टेकला जात असल्याने वाहन नादुरूस्त होत आहेत. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
याबाबत असे की, कोळदा ते सेंधवा या दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र कोरीट चौफुली ते तळोदा चौफुलीपर्यंतचा मार्ग खडतर झाला असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान, तळोदा चौफुलीवरी पेट्रोल पंपाजवळ संबंधित ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवला असून, या खोदलेल्या रस्त्यावर दगड गोटे टाकून ठेवले आहेत. मात्र ज्या ठिकाणी दगड व मुरूम टाकले आहे त्यावर जेसीबी अथवा रोटलदेखील फिरविण्यात आला नसल्याने वाहनधारक पर्यायी मार्गावरून जात आहेत. परंतु या पर्यायी रस्त्यावरच खड्डा तयार झाल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे. मध्यंतरी पावसाळा सुरू झाल्याने हा खड्डा अधिक पसरल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.या मार्गावरून वाहन काढताना मागील भाग खड्ड्यास टेकला जात असल्याने वाहनाचे नुकसान होत असून, या खड्ड्यात वाहन फसत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून या मार्गावरील अपूर्णावस्थेत असलेले काम त्वरित पूर्ण करून वाहनधारकांना सोयीचे करावे, अशी मागणी जोर  धरू लागली आहे.या ठिकाणी पोलिसांतर्फे बॅरिकेट्सदेखील लावण्यात आले आहे. याठिकाणी वेळोवेळी होणाºया ट्रॅफिक जाममुळे पोलीस कर्मचारीही वैतागले असून, संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.या समस्येबाबत संबंधित ठेकेदाराला वारंवार सांगूनही दुर्लक्ष करीत असल्याने गेल्या सहा महिन्यापासून वाहनधारक व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व जिल्हाधिकाºयांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देवून या मार्गावरील अपूर्णावस्थेत असलेले काम त्वरित मार्गी लावावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Our Team

  • Dharmendra PatilFounder & Director
  • Rohit PatilBloggers & Editor