Saturday, 18 April 2020

Coronavirus | भारतीय नौदलात कोरोनाचा शिरकाव; मुंबई डॉकयार्डवर तैनात नौसैनिकांना कोरोनाची बाधा

भारतीय सैन्यदलानंतर कोरोना व्हायरसने आता भारतीय नौदलातही शिरकाव केला आहे. मुंबई डॉकयार्डवर तैनात असलेल्या 21 नौसैनिकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसने भारतीय नौसेनेतही शिरकाव केला आहे. भारतीय नौदलाच्या आयएनएस आंग्रे या मुंबईतल्या तळावरच्या 21 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यापैकी 20 जण हे नौसैनिक म्हणून नौदलाच्या सेवेत आहेत. 7 एप्रिल रोजी आयएनएस आंग्रे येथील एक नौसैनिक कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलं होतं. त्याच्याच संपर्कातून अन्य नौसैनिकांनाही कोरोनाची लागण झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सध्या कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या नौसैनिकांपैकी अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणंही दिसून आलेली नाहीत. पण या साऱ्यांना विलगीकरण करून ठेवण्यात आलं आहे. तर नौसेनेच्या कोरोना बाधित नौसैनिकांवर आयएसएचएन अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आयएनएस आंग्रेच्या परिसरातही लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.
भारतीय नौदलातील नौसैनिकांना कोरोनाची लागण झाल्याची ही पहिलीच घटना आहे. याआधी भारतीय सैन्यदलातील आठ जवानांनाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. नौदलातील या नौसैनिकांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सध्या घेण्यात येत आहे. त्यासाठी शोध मोहिमही सुरू करण्यात आली आहे. मुंबईच्या किनाऱ्यावर भारतीय नौदलाचं आयएनएस आंग्रे हे तळ आहे. येथे नौसैनिकांची निवास्थानं आहेत. याच तळावरून पश्चिम नौदल कमांडच्या वेगवेगळया ऑपरेशन्ससाठी मदत करण्यात येते.

भारतीय नौदलाच्या आयएनएस आंग्रे या मुंबईतल्या तळावरच्या आसपासच्या परिसरात नौसैनिकांचा आवश्यक कामांसाठी वावर असू शकतो. असा अंदाज नौदलाकडून वर्तवण्यात येत आहे. तसेच देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे नौदलाच्या तळांवरील असलेल्या निवासी वसाहतीत नौसैनिक जात नाहीत. तर नौदलाच्या युद्धनौका किंवा पाणबुडीवर मात्र एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

mdtv

Author & Editor

0 comments:

Post a Comment

please do not enter any spam link in comment box.